दचलकलात ना? अरे हो,,,,, कपालभाती प्राणायाम नाहीच मुळात. अरे आम्हीतर कित्येक वर्षांपासून करत आहोत. मग कपालभाती प्राणायाम नाही तर आहे तरी काय? कपालभाती मध्ये जोर लावून श्वास सोडणे आणि घेणे हेच आम्ही करत असतो. आणि तुम्ही म्हणता कपालभाती प्राणायाम नाही. हो, हो सांगतो. कपालभाती ही श्वासाशी निगडित असल्याने बरेचशे लोक तो एक प्राणायामच आहे असे समजतात. योगाच्या कोणत्याही ग्रंथात कपालभाती ही प्राणायाम आहे असा उल्लेख नाही.
योग शास्राच्या ग्रंथांमध्ये काही योगिक शुद्धीक्रिया सांगितल्या आहे ज्याद्वारे मानवी शरीर शुद्ध करता येते किंबहुना शरीरातील संपूर्ण अशुद्धी काढून टाकली जाते. तर अश्या एकूण मुख्य सहा प्रकारच्या शुद्धीक्रिया आहे आणि त्यांचे एकूण सव्वीस (26) उपप्रकार सांगितले आहे. या शुद्धीक्रिया शरीराच्या वेगवेगळ्या भागाच्या शुद्धीकरता केल्या जातात. या सहा मुख्य प्रकारातील सर्वात शेवटची शुद्धीक्रिया म्हणजे कपालभाती, त्यातही तीन उपप्रकार आहेत क्रमशः वातक्रम, व्युतक्रम आणि शितक्रम. यातील “वातक्रम” ही जी शुद्धीक्रिया आहे जी श्वसन संस्था म्हणजे श्वसनाचे सर्व अवयव अगदी नाका पासून ते फुफुसाच्या शेवटच्या भागापर्यंत केली जाणारी शुद्धी क्रिया आहे. एक विशिष्ट पद्धतीने श्वास घेण्या सोडण्याची प्रक्रिया आहे आणि ती श्वासाशी निगडित आहे म्हणून लोक तो एक प्राणायाम आहे असे समजतात.
लोहाराचा भाता आपल्या सर्वांना माहीतच असेल, माहीत नसेल तर करून माहित करून घ्यायला विसरू नका. तर या लोहाराच्या भात्या मध्ये जशी प्रक्रिया होत असते अगदी त्याप्रमाणे कपालभाती मध्ये आपले श्वसन अपेक्षित आहे. लोहाराचा भात्याची दोरी ज्याप्रमाणे जोर लावून खाली ओढली जाते आणि भात्यातील म्हणजे कातडी पिशवीतील हवा जोरात बाहेर येते आणि अग्नी प्रज्वलित व्हायला मदत होते, नंतर जोर लावून ओढलेली दोरी सोडून देताच हवा कातडी पिशवीच्या मागच्या बाजूला असलेल्या भोकांतून हवा आपोआप भरली जाते, यात कोणतेही वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही. म्हणजे हवा बाहेर काढण्यासाठी जोर लावावा लागतो आणि हवा आत जाण्यासाठी जोर लावावा लागत नाही ती आपोआप आत जाते. अगदी अशीच श्वासाची वैशिष्टयपूर्ण प्रक्रिया कपालभाती मध्ये अपेक्षित आहे. म्हणजे बाहेर जाणारा श्वास जोर लावून सोडायचा असतो आणि आत येणारा श्वास हा आपोआप आत येऊ द्यायचा असतो.
आपण कपालभाती चुकीची तर नाही ना करत?🤔
ते समजून घेऊया. कपालभाती करत असताना श्वास कमी पडू लागला आणि गुदमरल्या सारखे झाले तर कपालभाती थांबवावी लागते आणि कमी पडलेला श्वास वाढवण्यासाठी लांब लांब श्वास घ्यावा लागतो, असे होत असल्यास समजून जा की आपण चुकीची पद्धतीने कपालभाती करत आहोत.
कपालभाती करत असतांना पोटाची जास्त हालचाल होत असते, जर पोटाचे स्नायू थकले किंवा दुखायला लागले तर कपालभाती थांबवावी लागते, पण यात गुदमरल्या सारखे होत नाही आणि लांब लांब श्वासही घ्यावा लागत नाही, असे होत असल्यास आपण कपालभाती अगदी बरोबर करत आहात.
आता आपण कपालभाती चे फायदे काय आहे ते पण जाणून घेऊया.
1 कपालभाती श्वसन संस्थेची शुद्धीक्रिया असल्याने यात श्वास जोरात बाहेर सोडला जातो त्यामुळे संपूर्ण श्वसनमार्गात असलेली अशुद्धता, धुलीचे कण,कफ, बाहेर टाकले जातात आणि नाकापासून ते फुफुसाच्या शेवटच्या पेशीं (alveoli) पर्यंत चांगली शुद्धी होते. श्वसन संस्थेची कार्यक्षमता वाढते. सर्व कफ दोष, वारंवार होणारी सर्दी, सायनुसायटीस(sinusitis), असे श्वसन मार्गाचे आजार बरे व्हायला मदत होते. संपूर्ण श्वसन संस्था शुद्ध राहिल्याने सर्व प्रकारच्या इन्फेकशन(Infection) पासून आपल्याला सुरक्षित ठेवता येते.
अगदी कोरोना पासूनही बरं का😊
2 श्वासाबरोबर यात पोटाचीही हालचाल होत असल्याने पोटावरची चरबीही कमी व्हायला मदत.
3 चेहऱ्यावरच्या स्नायूंचा रक्त पुरवठा चांगला होऊन चेहऱ्यावर तेज येते, चेहरा प्रसन्न दिसतो.
4 मेंदूचीही कार्यक्षमता वाढते आणि जागरूकता(awareness) वाढतो. असे अनेक फायदे आहे पण आपण येथे मुख्य फायद्यांचाच विचार करत आहोत.
मग आहे की नाही कपालभाती छान प्राणायाम!!!
अरे बघा मी पण प्राणायमच म्हटलो,😊 कपालभाती प्राणायाम नसून ती एक योगिक शुद्धीक्रिया आहे☺️☺️☺️☺️. आपण सर्वजण करत राहूया.
डॉ. योगेश्वर माधव सानप
होमोईओपॅथिक तज्ञ,
योग शिक्षक
लेवल 3
योगा सर्टिफिकेशन बोर्ड, भारत सरकार.
पिंपरी–चिंचवड
पुणे.
9049300831
